कोल्हापूर - झेपत नसेल तर सत्ता सोडा, असा सरळ सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले, मात्र हे सरकार पूर्णपणे गोंधळलेले, संवेदनशीलता नसलेले सरकार आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यांच्याशी अधिक चर्चा केली केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
झेपत नसेल तर सत्ता सोडा -
निसर्ग चक्रीवादळ, परतीच्या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र, केवळ केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील मागच्या सरकारकडे बोट करण्याचे काम सुरू आहे. त्यांना झेपत नसेल तर सत्ता सोडावी, असा थेट सल्ला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी त्यांनी एखादे घर विकत घेतल्यानंतर त्याच्या जुन्या मालकाला दोष न देता आपणच त्या घराची डागडुजी करायची असते, हे यांना कोण सांगणार, असा दाखला सुद्धा दिला.
कोरोना काळात अपयशी ठरलेलं हे सरकार -
महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, हे सरकार पूर्णपणे गोंधळलेले आहे. शिवाय कोरोना काळातसुद्धा सरकार अपयशी ठरले आहे. देशातील कोरोना मृत्यूच्या संख्येच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनाची रुग्ण संख्यासुद्धा सर्वाधिक आहे. त्यामुळे एकूणच हे मोठे अपयश म्हणावे लागेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.