कोल्हापूर - शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोल्हापुरातील वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी विचारात घेता जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सोमवारपासून (दि.२० जुलै)कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती पालक मंत्री सतेज पाटील यांनी दिली. या काळात केवळ औषध, दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी समूह संसर्गाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्यापूर्वीच जिह्यात लॉकडाऊन करावे, अशी मागणी काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत केली. तर 650 कोरोनाबाधितांसाठी जिह्यातील 40 लाख लोकांचे विलगीकरण करणार काय? असा सवाल उपस्थित करत काही लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन करण्यास विरोध दर्शवला.
या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन बाबत दोन मतप्रवाह समोर आलेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि उपलब्ध आरोग्य यंत्रणा पाहता लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत अनेक नेत्यांनी मांडले. तर काही कोरोना बाधित रुग्णांसाठी जिह्यातील सर्व जनतेचे विलगीकरण करणार काय? असा सवाल काही नेत्यांनी उपस्थित केला.