कोल्हापूर - गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस आणि शुक्रवारी झालेली अतिवृष्टी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता आणखी एक धोका निर्माण झाला आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासणोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वासणोली धरणासह तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या्प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अशाच परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बहुचर्चित असलेल्या वासणोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सांडव्यातील या पाण्यामुळे जवळपास 45 फूट खोल आणि शंभर फूट लांबीपर्यंत माती खंगाळून गेली आहे. मात्र, सांडव्याला पडलेल्या या भगदाडामुळे आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
रविवारी राधानगरीतून पाण्याचा विसर्ग-
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 225.31 दलघमी पाणीसाठा आहे. रविवारी दुपारी 4 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे एकूण चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे जवळपास 7 हजार 125 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजा क्रमांक 3, 4, 5 आणि 6 हे दरवाजे उघडले असून 1, 2 आणि 7 नंबरचे दरवाजे अद्याप बंद आहेत. सद्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 51 फुटांवर आली असून आता राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.