कोल्हापूर - 'फाशी झाली तरी चालेल, पण नाशिक येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढणार,' असा इशारा दलित महासंघाचे नेते प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी दिला आहे. यंदाच्या साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा, या प्रमुख मागणीसाठी या मोर्चा काढणार असल्याची माहिती सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अण्णाभाऊ साठे यांच्याकडे साहित्य संमेलनाचे दुर्लक्ष -
यंदाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. याला दलित महासंघाने विरोध केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी दलित महासंघाची आहे. त्याचा ठराव या संमेलनात करावा, अशी मागणी यापूर्वीच त्यांनी केली आहे. मात्र, याकडे मराठी साहित्य संमेलनात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दलित महासंघाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
केवळ दीड दिवस शाळेत जाणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राला भरभरून ग्रंथसंपदा दिली आहे. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून सामाजिक विषमतेवर सडेतोड प्रहार केले आहेत. अशा लेखकाला भारतरत्न मिळावा, अशी मागणी आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा, अशी दलित महासंघाची मागणी आहे. यापूर्वीच्या संमेलनात आम्ही मोर्चे काढले, आम्हाला अटक झाली. आता फाशी झाली तरी चालेल, मात्र मोर्चा नक्की काढणार, असा इशारा सकटे यांनी दिला आहे.