कोल्हापूर - आम्हाला बोकडाचे मटन परवडत नाही. मोदींना गायीचे इतके प्रेम का आहे? असा प्रश्न लक्ष्मण माने यांनी विचारला. वंचित आघाडीच्या सभेत ते कोल्हापुरात बोलत होते. माने म्हणाले, की आम्ही मांजरही खातो. जो प्राणी आवडेल तो खातो. कोणताच प्राणी सोडत नाही. काही दिवसांपूर्वी माने यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य देखील चांगलेच चर्चिले जात आहे.
माने म्हणाले, की गोरक्षेच्या नावाखाली हे सरकार माणसांना मारत आहे. आम्हाला ज्या प्राण्याचे मटन आवडते ते आम्ही खातो. यात यांना कसला त्रास होतो ? भाजप सरकारला थोपविण्यासाठी आरपीआयच्या पुढाऱ्यांना भेटलो. मात्र ते तोंडावर बोट ठेवून गप्प राहिले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांसाठी पुढाकार घेऊन या बहुजन वंचित आघाडीची निर्मिती केली. आता वंचित आघाडीचा झेंडा फडकावून आंबेडकरांना मुख्यमंत्री करण्याचा आपण सर्वांनी मिळून निर्धार करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
या सभेतील त्यांच्या गोरक्षेबद्दलच्या वक्तव्यावर बरीच चर्चा होत आहे. ते म्हणाले, की जगभर गाय-बैल खातात, आम्हीही खातो. आम्हाला बोकडाचे मटन परवडत नाही. मोदींना गायींचे इतके प्रेम का आहे ? यासाठी त्यांनी आता गोठा काढून द्यावा, असेही माने म्हणाले. आम्ही मांजर पण खातो. आम्ही कोणताच प्राणी सोडत असे वादग्रस्त वक्तव्य लक्ष्मण माने यांनी केले आहे. लक्ष्मण माने यापूर्वी मराठा समाजातील महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यात या वक्तव्याची भर पडली आहे.