कोल्हापूर - गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरातून परराज्यात रेल्वे सोडण्यात येत आहेत. आत्तापर्यंत 3 रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आम्हाला सुद्धा घेऊन जा म्हणत आज शेकडो मजूर महामार्गावर उतरले. येथील शिरोली एमआयडीसीमध्ये काम करणारे हे मजूर असून कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या मूळ गावी परत सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या 15 दिवसांपासून खाण्याची गैरसोय होत आहे. मालकांनी सुद्धा पगार देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, या एकाच मागणीवर ते अडून आहेत. कोल्हापूरच्या दिशेने येत असलेल्या मजुरांना तावडे हॉटेल येथे अडवून त्यांना पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन मजुरांना समजावण्याचा प्रयत्न करून तुम्हा सर्वांना लवकरच आपल्या गावी पाठविण्याची सोय करण्यात येईल, असे आश्वस्त केले आहे. गेल्या तीन दिवसांत कोल्हापुरातून मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तरप्रदेश अशा तीन राज्यांमध्ये जवळपास 4 हजार मजूर रेल्वेने पोहोचवण्यात आले आहेत. त्यामुळेच हे मजूर रस्त्यावर आले असून आपापल्या गावी जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत.