कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातल्या पट्टणकोडोली गावातील महिलांनी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. जिल्हा परिषदेच्या मोर्चामध्ये सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाच्या आणि संबंधित ठेकेदाराच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
गेल्या सहा वर्षांपासून हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात राष्ट्रीय पेयजल योजना रखडली आहे. या योजनेचे काम करण्यासाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीपासूनच संथ गतीने सुरू असल्याने आमच्या हक्काचे पाणी आम्हाला कधी मिळणार? असा प्रश्न महिलांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा-'शेतकरी कायदा रद्द होणार नाही, आंदोलनकर्ते राजकीय पक्षांचे'; रामदास आठवलेंची टीका
पट्टणकोडोलीचे उपसरपंच कृष्णाजी मसूरकर म्हणाले, की जोपर्यंत योजना पूर्ण करून देण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या सदस्या वंदना मगदूम यांनीसुद्धा आंदोलकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे.
गावकऱ्यांनी केलेल्या काही प्रमुख मागण्या
1) गावातील पेयजल योजना उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा हातकणंगले यांच्या निरीक्षणाखाली करण्यात यावी.
2) ठेकेदाराला आजपर्यंत दिलेल्या बिलाचे पुनर्मूल्यांकन करावे.
3) योजनेच्या मूळ ठेकेदारशिवाय सुपर ठेकेदारास या कामावर येण्यासाठी मज्जाव करावा.
4) या कामाबाबत समिती नेमावी. योजनेसाठी किती कालावधी लागणार याची लेखी हमी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी द्यावी.
5) ग्रामपंचायतीने अदा केलेल्या लिकेजचा खर्च तात्काळ ग्रामपंचायतीमध्ये संबंधित ठेकेदाराकडून जमा करण्यात यावा.