कोल्हापूर Kolhapur Tense situation - टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणारा मजकूर दुर्गा दौड असणाऱ्या मार्गावर लिहिल्यानं कोल्हापुरातील कसबा बावड्यात काही काळ तणाव निर्माण झाला. काही कार्यकर्ते भगवा चौकात जमले. आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी समजूत घातली. असा प्रकार करणाऱ्या समाजकंटकाला अटक करू असं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. मात्र राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या कसबा बावड्यात पुन्हा असा प्रकार झाल्यास उद्रेक होईल, अशा भावना यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणारा मजकूर - दरवर्षी कसबा बावड्यात दुर्गा दौडचं आयोजन करण्यात येतं. सोमवारी पहाटे दुर्गा दौड कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम चौक, शुगर मिल कॉर्नर या मार्गावरून जाणार होती. याच मार्गावर अज्ञात समाजकंटकांनी टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणारा मजकूर लिहिला होता. एका संघटनेच्या कार्यकर्त्याच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना ही गोष्ट कळवली.
अटकेच्या आश्वासनानंतर जमाव शांत - पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन समाजकंटकाने लिहिलेला मजकूर पुसून टाकला. बघता-बघता ही गोष्ट पूर्ण कसबा बावड्यात पसरली. बावड्यातील भगवा चौकात एका संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले. यावेळी मजकूर लिहिलेल्या अज्ञात समाजकंटकाचा निषेध करण्यात आला. तसंच त्याला तत्काळ अटक करावी, ही मागणी लावून धरत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापूर शहराचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढून मजकूर लिहिणाऱ्या समाजकंटकाला लवकरच अटक केली जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
जून २०२३ मध्ये कोल्हापुरात झाला होता हिंसाचार - कोल्हापुरात जून २०२३ मध्ये सोशल मीडियावर औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या पोस्टवरून दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर काही संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरलं होतं.
हेही वाचा-