कोल्हापूर - राधानगरी तालुक्यात असणाऱ्या धामोडमधील युनियन बँकेवर पडलेल्या दरोडा प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या दरोड्यामध्ये दरोडेखोरांच्या हाती पाच पैसेही लागले नसल्याचा बँक अधिकाऱ्यांनी दावा केला होता. मात्र, आता स्वतः बँकेच्याच अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन 18 लाख रूपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवली आहे.
धामोड गावातल्या युनियन बँकेवर दरोडा पडल्याची घटना आठ जानेवारीला उघडकीस आली होती. यावेळीच बँकेच्या स्ट्राँगरुममधील सोने चोरीला गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र तपासाअंती हा दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या नव्या फिर्यादीमध्ये, तब्बल 17 लाख 98 हजार किंमतीचे दागिने चोरीला गेल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली आहे.
याआधी काहीही चोरीला गेले नाही असे प्रसारमाध्यमांसमोर म्हणालेल्या बँक अधिकाऱ्यांनी आता अशी फिर्याद दाखल केल्यामुळे परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना घोषित रक्कम मिळाली नाही, काका पवारांच्या गौप्यस्फोट