कोल्हापूर - गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे यावर्षीही कोल्हापुरात पूर आला आहे. पंचगंगा नदीने आज दुपारी धोक्याची पातळी ओलांडली असून सद्यस्थितीत पाणी पातळी 43.2 इतकी झाली आहे.
राधानगरी धरण तुडूंब भरले असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या पथकांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात केली आहेत.
दरम्यान, नदीकाठच्या सर्वच गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला असून पुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या गावांतील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही गावातील नागरिकांनी या वर्षी स्वतःहूनच स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
आज सकाळपासून काही अंशी पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, नदीची पाणीपातळी संथगतीने वाढतच चालली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास यावर्षी पुन्हा पुराचा मोठा फटका बसतो की काय अशी भीती सर्वजण व्यक्त करत आहेत. पावसाचा जोर ओसरण्याची अनेकजण प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि गत वेळच्या महापुराचा अनुभव असल्यामुळे प्रशासन मात्र सज्ज झाले असून वेळीच विविध ठिकाणी पथके तैनात केली आहेत.