कोल्हापूर : सुळकुड योजनेवरुन शेतकऱ्यांनी आम्ही सर्वजण कर्नाटक राज्यात जाऊ, असा गंभीर इशारा कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारला दिला. कागल तालुक्यातील सुळकुड येथे झालेल्या सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांनी हा इशारा दिला आहे. जे नेते सुळकुड योजना रद्द न करण्याचा विरोध करतील त्यांना मतदान न करण्याचा निर्णय तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
तालुक्यातील सुळकुड योजना रद्द करा, अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु तालुक्यातील एक राजकीय नेते जनतेसोबत राहिले नाहीत. याचा परिणाम त्यांना निवडणुकीत भोगावे लागेल. आता लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनाही जनतेची ताकद दाखवून देण्याची हीच खरी वेळ असल्याचा सूर या शेतकरी मेळाव्यात उमटला. कृती समितीचे धनराज घाटगे म्हणाले, जिल्ह्यातील अन्य मतदार संघातील नेते स्वतःच्या मतदारसंघातील गावांसाठी पिण्याचे पाणी नेण्यासाठी योजना राबवत आहेत. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कागल तालुक्यातील नेतेमंडळी गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करून जनतेच्या लढ्यात जिल्ह्यातील मंत्री आमदार खासदारांनी सहभागी व्हावे आणि शासन दरबारी योजना रद्द होण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
अधिकाऱ्यांचा निषेध : या मेळाव्यात पाटबंधारे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुधगंगा प्रकल्प पाणीसाठाबाबत नागरिकांना चुकीची माहिती दिली. नियोजनाअभावी पहिल्यांदाच दुधगंगा प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला. यामुळे काही काळ शेतीसाठीही पाणी मिळाले नाही. शून्य नियोजना करणाऱया पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. तर दुधगंगा योजना पुढे रेटत असलेल्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कृतीचाही यावेळी निषेध करण्यात आला.
दुसऱ्या राज्यात जाण्याचा इशारा : ही योजना बंद करण्यासाठी सरकारने काही हालचाली घेतल्या नाहीत तर येथील गावकऱ्यांनी दुसऱया राज्यात जाण्याचा निर्णय केला आहे. शासनाने निर्णय न घेतल्यास 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत अनेक गावे आपल्या मुलाबाळासह कर्नाटकात जाण्याचा निर्धार करतील असा इशारा नागरिकांनी दिला आहे. दुधगंगा नदी काठावरील सुळकुड, कसबा सांगाव, लिंगनूर दुमाला, करनूर, वंदूर यासह अनेक गावातील ग्रामपंचायतींनी याबाबतचा इशारा सरकारला दिला आहे.