कोल्हापूर - शासकीय कार्यालयांचे पाणीबिल थकीत असल्याप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी थेट जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्या आहेत. थकीत पाणीबिल भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा या नोटिसद्वारे देण्यात आला आहे.
हेही वाचा - कोल्हापूरात 5 हजारांची लाच स्वीकारताना एमएसईबीच्या सहाय्यक अभियंत्यासह एजंटला अटक
महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहर परिसरात असणाऱ्या शासकीय कार्यालयांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र, अनेक वर्षे शासकीय कार्यालयांनी पाणीबिल थकीत ठेवले आहे. पाणी पुरवठा विभागाचे यावर्षीचे वसुलीचे उद्दिष्ठ हे ६८ कोटी ५० लाख इतके आहे. त्यातील जवळपास ३८ %, म्हणजे २५ कोटी ९६ लाख रुपये वसूल झाले आहेत. तर, उर्वरित रक्कम मार्च अखेर वसूल करायची आहे. त्यातील ३० कोटी रुपये हे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक पुरवठ्यातून वसून करायचे आहेत. तर, तब्बल १८ कोटीचे पाणीबिल शासकीय कार्यालयांतून थकीत आहे. त्यामुळे, ज्या कार्यालयांनी अद्याप बिल भरले नाही त्यांना आयुक्त बलकवडे यांनी नोटीस पाठवल्या आहेत.
नोटीस पाठवलेली कार्यालये पुढील प्रमाणे :
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत, सीपीआर, रेल्वे विभाग, पाटबंधारे वारणा, शिवाजी विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे पंचगंगा आणि टेलिफोन कार्यालयासह अन्य कार्यालयांचा समावेश आहे. या सर्व कार्यालयांना नोटीस पाठवून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोणाची किती थकबाकी -
ग्रामपंचायत - ६ कोटी ९४ लाख ६४ हजार ९२७, सीपीआर - ६ कोटी ६२ लाख ४७ हजार ८०१, रेल्वे विभाग - १ कोटी ६ लाख ७ हजार ४२, पाटबंधारे वारणा - ८६ लाख ८० हजार ३२०, शिवाजी विद्यापीठ - ६६ लाख ३८ हजार ६९६, सार्वजनिक बांधकाम विभाग, ५८ लाख ९३ हजार ९६, पाटबंधारे पंचगंगा - ५४ लाख ४१ हजार ८३२, जिल्हाधिकारी कार्यालय - २३ लाख ८० हजार २६६, जिल्हापरिषद -१६ लाख ८२ हजार ३६७, टेलिफोन कार्यालय - ८५ लाख ३ हजार ८५८
हेही वाचा - कोल्हापूर : तब्बल दीड एकरात पसरलेय भले मोठे वडाचे झाड, गोठणदेव राखण करत असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा