कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत कोरोनाच्या या लढाईत सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले.
प्रायोगिक तत्वावर 18 ते 45 वयोगटातील 200 जणांचे कोरोना लसीकरण -
कोल्हापूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आज 18 ते 45 वयोगटातील 200 जणांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीचा तुटवडा आहे पण लसीकरण सुरू राहावे या हेतूने जिल्ह्यातील 5 केंद्रावर हे लसीकरण सुरू राहणार आहे. पुढचे 8 दिवस 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू असणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांनीच लसीकरणासाठी जावे, कोणीही गर्दी करू नये असे आवाहन सुद्धा आज महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी नागरिकांना केले. शिवाय ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या रूपाने आपल्या महाराष्ट्रासमोर एक संकट उभे आहे. पण, महाराष्ट्र या संकटाला खंबीरपणे व संयमाने सामोरे जात आहे. या लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्राचा इतिहास कायम स्मरणात ठेवेल. लवकरच आपण सर्वजण मिळून या संकटावर नक्कीच मात करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात अव्वल करू असेही पालकमंत्र्यांनी म्हटले.
सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र दिन सर्वांना साधेपणाने साजरा करावा लागत आहे. शासनाचे हे निर्देश पाळत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला. दरम्यान, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व कामगारांना सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी 'कामगार दिना'च्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - रायगडात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा 1 मे मुहूर्त टळला; लस नसल्याने लसीकरण बंद