कोल्हापूर - जोतिबा डोंगरावर येत्या 16 एप्रिलला चैत्र यात्रा होणार आहे. ( Jotiba Yatra 2022 ) कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, यावर्षी चैत्र यात्रा अगदी उत्साहात होणार आहे. भक्तांना सुद्धा कोणतेही निर्बंध राहणार नाहीत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ( Sataj Patil on Jotiba Yatra 2022 ) या निर्णयानंतर भाविकांसह जोतिबा डोंगरावरील स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. आज यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
10 लाख भाविक येण्याची शक्यता - श्री क्षेत्र जोतिबा येथे दरवर्षी लाखो भक्त चैत्र यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे त्याची जय्यत तयारी केली जाते. दोन वर्षांपासून यात्रा झाली नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात भक्त येण्याची शक्यता आहे. जवळपास 5 ते 6 लाख भाविक दरवर्षी येतात. मात्र, भक्तांचा उत्साह यावर्षी प्रचंड असण्याची शक्यता ओळखून प्रशासनाने 10 लाख भाविक येतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार तयारी सुरू आहे, अशी माहितीसुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. दरम्यान, यात्रेनिमित्त प्रसाद, नास्ता, पाणी तसेच इतर वस्तूंचे अनेक स्टॉल तसेच दुकानं असतात. त्या सर्व व्यावसायिकांना मात्र दोन डोस बांधनकारक करण्यात आले आहेत. इतर कोणतेही बंधन त्यांना नसणार, अशी माहिती सुद्धा पालकमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा - Library in Umarga : उमरगा येथे ''पान टपरी नव्हे ज्ञान टपरी''ची स्थापना; वकिलाचा अनोखा उपक्रम
मंदिराची रंगरंगोटी तसेच स्वच्छतेची कामे सुरू - जोतिबा मंदिरात सद्या यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली असून रंगरंगोटी तसेच स्वच्छतेची कामे सुरू झाली आहेत. संपूर्ण मंदिर पाण्याने धुवून काढण्यात येणार आहे. मंदिराचे शिखर, दीपमाळ, दगडी कमानी, पालखी आदी साहित्यांची सुद्धा स्वच्छता होणार आहे. विशेष म्हणजे यंदा जोतिबा मंदिराभोवती असलेली लोखंडी ग्रील काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मंदिराचे मूळ दगडी रूप भक्तांना दिसणार असून ग्रील मुक्त झालेले मंदिर भक्तांना पाहता येणार आहे.