कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत असून जिल्ह्यात ४७४ ग्रामपंचायतीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी सुरु आहे.मात्र, निवडणुकीआधीच भाजपने जिल्ह्यात पहिला विजयी गुलाल उधळला असून शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतवर भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली असून भाजपच्या वतीने निवडणुकीपूर्वीच विजयाचे खाते उघडले आहे.
निवडणुकीपूर्वीच भाजपची विजयजल्लोष : शिरोळ तालुक्यात सतरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर राजापुरवाडी सरपंच पदासाठी भाजपाचे उमेदवार रावसाहेब रामू कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.आज छाननीनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करुन जल्लोष केला तर निवडीनंतर भाजप युवा मोर्चाकडून रावसाहेब कोळी व ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झालेल्या अभिजित रामचंद्र कोळी यांचा सत्कार करण्यात आला. यामुळे भाजपा पक्षाचा सरपंच बिनविरोध करत सर्वप्रथम जिल्ह्यात खाते उघडले असून तालुक्यात अन्य ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मित्र पक्षासोबत आघाडी करुन भाजपाने बहुतांशी सरपंच व सदस्य निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
अशी आहे अन्य तालुक्यातील स्थिती : शाहूवाडी तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी 204 अर्ज आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील 50 तालुक्यातील 260 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी 303 अर्ज आहेत. शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी 122 अर्ज आहेत. गगनबावडा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 81 अर्ज दाखल आहेत. कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल झाले आहेत. आजरा तालुक्यात 36 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल आहेत. चंदगडमधील 40 ग्रामपंचायतींसाठी 170 अर्ज दाखल झाले आहेत.