कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून सोमवारी दुपारपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद झाला आहे. येथील मांडुकली गावाजवळ दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोकणातून येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.
हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पन्हाळा तालुक्यातील गोठे-परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर काही तास असाच राहिला तर कोल्हापूर-पन्हाळा रस्तासुद्धा बंद होण्याची शक्यता आहे. आजरा आणि राधानगरी तालुक्यातसुद्धा अतिवृष्टी झाली आहे.