कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या वर्षी महापुराने थैमान घातल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शासन-प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि कोल्हापूरकरांच्या धैर्य आणि संयमी वृत्तीमुळे महापुरातूनही कोल्हापूरकर सावरले. पण, पुरामुळे जिल्ह्याची फार मोठी हानी झाली. गेल्या वर्षीच्या अनुभवावरून आणि यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले असून पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सजग केली असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या महापुराचा कटू अनुभव डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज आणि सतर्क केली आहे. महापुराचा सामना करताना कोणतीही कमी राहू नये, यावर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भर दिला असून पूरबाधित गावांमध्ये पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन केले आहे. गेल्या वर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बोटींची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच एनडीआरएफची 2 पथके बोटिंसह मागणी केली असून भारतीय तटरक्षक दलही बचाव व मदत कार्यासाठी सक्रीय झाले आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री सुद्धा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
गतवर्षी महापुरामुळे बाधित झालेली गावे आणि उपाययोजना :
गेल्या वर्षी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील 386 गावे बाधित झाली, यामध्ये कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्यातील 42, हातकणंगले -23, करवीर-57, कागल-41, राधानगरी -22, गगनबावडा-19, पन्हाळा-47, शाहुवाडी-25,गडहिंग्लज -27, चंदगड-30,आजरा-30 आणि भुदरगड तालुकयातील -23 गांवाचा समावेश आहे. या पूरबाधित गांवामध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने शोध व बचाव पथके स्थापन केली असून गाव ते जिल्हा पातळीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान केल्या आहेत. पूरबाधित गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचेही नियोजन करण्यास प्राधान्य दिले आहे.
जिल्ह्यातून प्रामुख्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि घटप्रभा या नद्या वाहतात. तर राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगांव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा जांबरे ही धरणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने पाटबंधारे विभागही सज्ज आणि सजग झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस तसेच धरणप्रकल्पातील पाणीसाठा, विसर्ग आणि त्यानुसार नद्यीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या सर्व गोष्टी नियोजनबध्द, शास्त्रसुध्द पध्दतीने करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. महापुरास कारणीभूत मानल्या जाणाऱ्या अलमट्टी प्रकल्पाच्या पाणीसाठा आणि विसर्गाबाबतही बेळगाव, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर सुयोग्य नियोजन ठेवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरनियंत्रणासाठी आवश्यक पूर्वतयारी करून पुराचा धोका असणाऱ्या गावांबरोबरच तालुका आणि जिल्हा पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन गट कार्यान्वित करून आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनाचे प्रशिक्षणही दिले आहे. गाव पातळीवरही शोध व बचावपथके कार्यान्वित केली असून यामध्ये महसूल विभागाबरोबरच पोलीस, जिल्हा परिषद, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी, आरोग्य, गृहरक्षक, अग्निशमन दलाबरोबरच जिल्ह्यातील विविध बचाव पथके आणि गावातील तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. पुराचा धोका असणाऱ्या गावांमध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापुराला तोंड द्यावे लागल्यास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही यंदाच्या पावसाळ्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाही करणे महत्त्वाचे झाले आहे. महापुराच्या काळात पूरबाधित गावात बचाव व मदत कार्य गतिमान करण्याबरोबरच पूरग्रस्थांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाची ठिकाणे निश्चित करणे, निवारागृहांची निवड करताना वीज, पाणी, स्वच्छतागृहे, भोजन, औषधोपचार आदी पायाभूत सुविधांची उपलब्धी महत्त्वाची आहे. पूरप्रतिबंधक उपायोजना राबविताना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, यादृष्टीने पूरपरिस्थितीमध्येही कोरोना प्रतिबंधक उपाय करणे महत्त्वाचे असून यामध्ये प्रामुख्याने सामाजिक अंतर, स्थलांतरीत लोकासाठींच्या निवारागृहामध्ये निर्जंतुकीकरणाची साधने, मास्क, सॅनिटायझर यांचीही उपलब्धता करण्यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भर दिला आहे.
संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीवर एक नजर
यामध्ये इन्फ्लेटेबल रबर बो ट- ओबीएम सह - 8, रबर बोट जुन्या आणि नव्या मिळून 17, एअर पंप फॉर बोट- 6, टॉर्च सर्च लाईट- 40, लाईफ बाईज-30, सेफ्टी हेलमेट-50, मेगा फोन-21, फलोटींग पंप-7, स्कुबा डायव्हिंग सेट -2, लाईफ जॅकेट -200, लाईफ बॉय रिंग- 306, सर्च लाईट -20, हेड लाई विथ झूम – 10, फलोटींग रोप मिटर-100 , इन्फ्लेटेबल लाईफ जॅकेट -50, अंडर वॉटर सर्च लाईत-10 तसेच आस्का लाईट-18 यांचा समावेश आहे. संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी उपलब्ध करून दिलेली साधनसामुग्री योग्य स्थितीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यात आली आहे. जिल्हयातील स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, आपदा मित्र अशा 808 स्वयंसेवकांचा बचाव पथक तैनात केले आहे. गावागावात तरुणांची फौजच उभी करण्यात येणार आहे.
आता 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित
जिल्हाधिकारी कार्यालयात आता 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून संभाव्य पूरपस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे. यासाठी नियंत्रण कक्षाचा 1077 हा टोल फ्री क्रमांक आहे. 0231-2659232 तसेच पोलीस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी 100 तसेच 0231-2662333 असे दूरध्वनी क्रमांक आहेत. याशिवाय पाटबंधारे विभागाने सर्व धरण प्रकल्पावर तसेच जिल्हास्तरावरही आपत्ती नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत ठेवण्यात आले आहेत.