कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या 6 महिन्यांत पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या विक्रीमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारीसुद्धा घटल्या असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाने दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 298 पेट्रोल पंप आहेत. जिल्ह्याला दररोज 5 लाख 20 हजार लिटर पेट्रोल, तर 6 लाख लिटर डिझेल दररोज लागते. लॉकडाऊनमुळे यामध्ये 20 ते 30 टक्के घट झाली आहे. ज्यावेळी 3 महिने पूर्णपणे जिल्हाबंदी होती, त्या काळात विक्रीत 60 टक्के घट झाली होती. या दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल विक्रीमध्ये अनियमितता असल्याबाबत कोल्हापूरात एकही तक्रार कोल्हापूर जिल्हा वैधमापन शास्त्र विभागाला प्राप्त झाली नाही. एका ठिकाणी पेट्रोल कमी मिळत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती. मात्र, त्या ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक दत्तात्रय पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
कोल्हापुरात वर्षभरात इंधन वितरण यंत्रणेत छेडछाड केल्याच्या घटना घडल्या नसल्या तरी, भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी वैधमापन विभागाचे अधिकारी काळजी घेत आहेत. अधिकारी वारंवार अनेक पेट्रोल पंपांवर अचानक भेट देऊन त्या ठिकाणी पाहणी करत आहेत. नागरिकांमध्येसुद्धा याबाबत जनजागृती केली जात असून त्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात, असे आवाहन केल्याचे दत्तात्रय पवार यांनी सांगितले.
पेट्रोल-डिझेलमध्ये जर कोणी भेसळ करताना आढळल्यास 50 हजार रुपये दंड आणि 6 महिन्यांहून अधिक शिक्षेची तरतूद असल्याचेही पवार यांनी सांगितले.