कोल्हापूर - पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे मतदान आज पार पडले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेमध्ये उभे राहून न्यु मॉडेल इंग्लिश स्कुलमधील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात सकाळपासून मतदानासाठी नागरिक बाहेर पडले होते. जिल्ह्यातील अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा बाजावला मतदानाचा हक्क -
उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी न्यु मॉडेल हायस्कुलमधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा अधिकार बजावला. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी जयसिंगपूर येथील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी मिरजकर तिकटी येथील नूतन मराठी विद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

चार पदे झाली होती रिक्त -
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते विजयी झाल्याने ही पदवीधरची जागा रिक्त राहिली होती. नागपूरमधून भाजपाचे सदस्य अनिल सोले यांचीही 19 जुलैलाच मुदत संपली होती, तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतीश चव्हाण तसेच शिक्षक मतदारसंघापैकी पुण्यातील अपक्ष सदस्य दत्तात्रय सावंत, अमरावती शिक्षक मतदारसंघातील श्रीकांत देशपांडे यांचीही मुदत यादरम्यान संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता.
दोन दिवसांनी म्हणजेच 3 डिसेंबरला या पाचही जागांचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे.