कोल्हापूर - महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आहे. ही बदली रद्द करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. या संदर्भात आज शिवाजी चौकात आपच्यावतीने निदर्शने करण्यात आली. महापूर, कोरोना काळात डॉ. कलशेट्टी यांनी चांगले काम केले. सलग ७५ आठवडे सुट्टी न घेता प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ केले. या बदलीने त्यांच्यावर अन्याय झाला असून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूरचे नागरिक करत आहेत.
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची दोन दिवसांपूर्वी तडकाफडकी बदली करण्यात आली. या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला आहे. डॉ. कलशेट्टी यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना त्यांची बदली का केली? असा प्रश्न जनतेने केला आहे. आज बदलीच्या विरोधात आपच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी 'आयुक्त डॉ.कलशेट्टी परत या, परत या' अशा घोषणा देण्यात आल्या.
सर्वसमावेशक भूमिका घेऊन डॉ. कलशेट्टी यांनी नेहमीच कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. आल्यापासून स्वच्छता मोहीम राबवून कोल्हापूर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशा प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली होणे योग्य नाही. त्यांची बदली रद्द करण्यात यावी, अशी भूमिका नागरिकांनी आणि आपने घेतली आहे.