कोल्हापूर - यावर्षी सुद्धा गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार कोहळा पंचमी पार पडली. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडत असतो. मात्र, यावर्षी काही ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी अंबाबाईची पालखी चालत घेऊन न जाता सजवलेल्या वाहनातून नेण्यात आली. काय आहे कोहळा पूजन परंपरा आणि यामागची आख्यायिका पाहुयात..
दरवर्षी ललिता पंचमीनिमित्त म्हणजेच नवरात्रौत्सवाच्या पाचव्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई तिची प्रिय सखी त्र्यंबोली देवीला भेटायला जाते, अशी आख्यायिका आहे. आजच्याच दिवशी अंबाबाईने कोल्हासूराचा वध केला ती ही तिथी. कोल्हासूराने मरताना वर मागितला की, त्याच्या वधाची स्मृती म्हणून दरवर्षी कोहळा फोडला जावा. त्याला दिलेल्या वराप्रमाणे अंबाबाई दरवर्षी कोहळ्याचा बळी आपल्या मंदिरात देत असे. कोल्हासूराचा नातू कामाक्ष याने तप करून कपिलमुनींकडून योगदंड मिळवला होता. त्याच्या प्रभावाने त्याने हा सोहळा करण्यासाठी जमलेल्या सर्व देवांचे बकऱ्यांमध्ये रूपांतर केले. त्र्यंबोलीने स्वचातुर्याने कामाक्षाचा वध केला व देवांची मुक्तता केली. मात्र, या आनंदात देव त्र्यंबोलीला विसरले. तेव्हा अंबाबाई तिची समजूत घालायला तिच्या दारी गेली आणि प्रेमाने तिची समजूत घातली. शिवाय कोहळा बळीचा मान दिला. त्या वरा प्रमाणे अंबाबाई हत्तीवर बसून त्र्यंबोली भेटीला जाते.
या आख्यायिकेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात कोहळा फोडण्याचा सोहळा पार पाडतो. त्यासाठी दरवर्षी अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी निघते. तोफेची सलामी झालेनंतर पालखी पूर्व दरवाजातून पायघड्यावरुन चालत निघते. चोपदार, रोशननाईक, हवालदार तसेच समितीचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी व देवस्थानचे श्री पूजक यांच्यासह सर्वच महत्वाच्या व्यक्ती नेहमी पालखीसोबत जात असतात.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी चालत घेऊन न जाता सजवलेल्या वाहनातून नेण्यात आली. बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीज, पार्वती टॉकीज, शाहू मिल, बागल चौक येथून कमला कॉलेज मार्गे पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी नेण्यात आली. अंबाबाई व त्र्यंबोली भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर कोल्हासुराचे प्रतीक म्हणून कुमारिकेच्या हस्ते कोहळा फोडण्यात आला. युवराज मालोजीराजे, शहाजीराजे यांच्या हस्ते कुमारिकेचे पूजन करण्यात आले. पारंपरिक विधी पार पडल्यानंतर कोहळा फोडताच कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा एकच झुंबड उडाली. यावेळी त्र्यंबोली देवीच्या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरत असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण सोहळा केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला.