कोल्हापूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्याविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस बजावली ही सामान्य जनतेला आणि सामान्य मुलीला दिलेली धमकी असल्याचे कल्याणी माणगावे यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या धमकीला आम्ही घाबरत नाही. नोटीशीमध्ये माफी मागण्याचा उल्लेख देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे. पण ही माफी मागायचा कोणताही प्रश्न येत नाही. उलट त्यांनीच कोल्हापूरच्या जनतेची माफी मागावी, असेही कल्याणी म्हणाल्या.
महापुरावेळी कोल्हापूरच्या जनेतेचे हाल झाले. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. हे सर्व कोल्हापूरकरांना माहिती आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारची माफी मागणार नसल्याचे कल्याणी माणगावे यांनी म्हटले आहे.
महायुतीला कोल्हापूरकरांनी नाकारल्यानंतर कोल्हापूरकर कधी सुधारणार नाहीत, अशा उल्लेखाची प्रेस नोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सारवासारव करत ही पक्षाची अधिकृत प्रेसनोट नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. मात्र, त्याच्या तीव्र प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटल्या होत्या. काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या आणि व्यवसायाने वकील असलेल्या कल्याणी माणगावे यांनीही एका व्हिडीओद्वारे चंद्रकांत पाटलांचा निषेध नोंदवला होता. त्यावर चंद्रकांत पाटलांनी कल्याणीविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे माफी मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका तरुणीला अशा पद्धतीने एका मोठ्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षाने बजावलेल्या नोटीशीबद्दल सोशल मीडियात सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही याची दखल घेत कल्याणीला आधार दिला आहे.