कोल्हापूर - दख्खनचा राजा अशी ख्याती असलेल्या जोतिबा मंदिराच्या 'शेवटच्या खेट्यावर' कोरोनाचा परिणाम झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून जोतिबा मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले असून रविवारी दिवसभर मंदिर बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र, मुख दर्शनाची सोय केली आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ५ कोरोना बाधित रुग्ण; पुण्यातील रुग्णांचा आकडा १५ वर
आज जोतिबाचा शेवटचा खेटा आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, यात्रा बंदीचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांसाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात येत आहे. मंदिर परिसरात भक्तांना वाटण्यात येणारा लाडूचा प्रसादसुद्धा बंद करण्यात आला आहे.