कोल्हापूर - आपला देश नव्या स्वातंत्र्य लढ्याच्या उंबरठ्यावर आहे. आरएसएस आणि मुस्लीम लीगचे विचार सारखेच असून दोघांनी देशात अराजकता पसरवण्याचे काम केले आहे, अशा शब्दात गीतकार जावेद अख्तर यांनी आमदार वारिस पठाण आणि भाजपचा समाचार घेतला.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला गुरुवारी पाच वर्षे पूर्ण झाली. या निमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात 'स्मृती जागर सभा' आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी जावेद अख्तर हे बोलत होते. महात्मा गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हेही वाचा - 'भारताला मोठं करण्यासाठी हिंदुत्वाला मजबूत करण्याची गरज'
भाजप हा आरएसएसची एक शाखा आहे. जे आज देशभक्तीचे प्रमाणपत्र देत आहेत, त्यांनी ब्रिटिशांविरोधात एक तरी आंदोलन केले आहे का? आरएसएस आणि मुस्लीम लीगचा एक तरी कार्यकर्ता जेलमध्ये गेला आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वारिस पठाण यांचे वक्तव्य मुर्खपणाचे आहे. देशात एकता असताना हे कोणत्या 15 कोटींची भाषा करत आहेत, असे अख्तर म्हणाले.
आता मेणबत्ती पेटवून चालणार नाही, तर हातात मशाल घ्यावी लागेल. पानसरे यांची हत्या होऊन पाच वर्षे झाली, तरीही आरोपी मोकाट आहेत. हे अतिशय दुर्दैवी असून आपण अराजकतेला मान्यता दिल्याचे प्रतीक असल्याचे मत गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांनी व्यक्त केले. देशाचा आत्मा बदलण्याचा प्रयत्न होतो आहे.
बाकीचे दिवस गोडसे समर्थन करणाऱ्यांना दोनच दिवस बापूंची आठवण येते, असा टोला गांधी यांनी भाजप नेत्यांना लगावला. दांडी यात्रेच्या ९०व्या वर्षपूर्तीनिमित्त आपण साबरमती येथून दांडी यात्रा काढली जाणार आहे. यासाठी कोणत्याही परवानगीची मला गरज नाही, असेही ते म्हणाले.