कोल्हापूर - तब्बल पाच महिने आंतरजिल्हा बंद असलेली एसटीची वाहतूक आजपासून सुरू झाली. कोल्हापूर-सांगली मार्गावर आज सकाळी साडेसात वाजता पहिली गाडी रवाना झाली. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर एसटी विभागाकडून प्रवाशांसाठी सीटवर पडदे लावण्यात आले आहेत. आज सकाळी प्रवाशांचा प्रतिसाद कमी असला तरी, लॉकडाऊननंतर एसटीच्या अवस्थेला उर्जित स्वरूप देण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांसह कर्मचाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीची चाके थांबली होती. १७ जूनपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सुरू करण्यात आली होती. एसटीची अवस्था पाहता आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून सुरू झाल्याने व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारपासून आंतरजिल्हा एसटीची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - मुश्रीफांची केविलवाणी धडपड केवळ निष्ठा दाखवण्यासाठी; चंद्रकांत पाटील यांचा टोला
आज कोल्हापूर विभागातून सकाळी साडेसात वाजता कोल्हापूर-सांगली मार्गावर पहिली एसटी धावली. खबरदारी म्हणून कोल्हापूर विभागाकडून दोन्ही प्रवाशांच्यामध्ये कापडी पडदे लावले आहेत. या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या पास, ई-पासची आवश्यकता नाही. कोल्हापूर विभागातून सांगली, सातारा, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार इतर जिल्ह्यात वाहतूक सुरू करणार असल्याचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी सांगितले. तसेच सॅनिटायझेशन करून बस सुरू करण्यात आल्या असून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
छोट्या-मोठ्या व्यापारी, फेरीवाल्यांना दिलासा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे छोट्या-मोठ्या व्यापारी आणि फेरीवाल्यांना दिलासा मिळाला आहे. कारण फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह शहरात येणाऱ्या प्रवाशांमुळे होत असतो. राज्य सरकारच्या या निर्णयावर फेरीवाल्यांनी समाधान व्यक्त केले आहे.