कोल्हापूर - दीपावलीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. अवघ्या काही दिवसांवर दीपावली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अणेकजण आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य आदी खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. आपणही जर दीपावलीच्या खरेदीसाठी बाहेर पडणार असाल आणि खरेदी कुठे करावी असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील कैद्यांनी चक्क दीपावलीचे साहित्य बनविले असून त्यांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी येथील स्थानिक नागरिक मोठी गर्दी करत आहेत.
दररोज लाखोंची उलाढाल
दीपावलीनिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात बंदीजनांकडून आकाश कंदील, पणत्या, फराळाचे पदार्थ आदी बनवून घेतले जात असतात. या सर्व वस्तू कळंबा कारागृहाबाहेरच दरवर्षी विक्रीसाठी ठेवल्या जातात. जवळपास एक ते दीड आठवडा याचे प्रदर्शन आणि विक्री सुरू असते. दिवसभरात लाख ते दीड लाख रुपयांची उलाढाल होत असते. दोन दिवसांत तब्बल 3 लाखांपर्यंतची उलाढाल झाली आहे.
मागील 6 वर्षांपासून कळंबा कारागृह प्रशासनाचा उपक्रम
गेल्या अनेक वर्षांपासून कैद्यांकडून विविध वस्तू बनविल्या जात आहेत. मात्र, 6 वर्षांपासून कलंबा कारागृहाबाहेरच मोठा स्टॉल उभा करून त्यामध्ये दीपावलीच्या पूर्वी एक आठवडा याची विक्री सुरू केली आहे. या सहा वर्षांत लाखोंची उलाढाल झाली असून यापुढेही नागरिकांनी कैद्यांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करून सहकार्य करावे, असे आवाहन कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुलकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे.
कारागृहाकडून कैद्यांना प्रशिक्षण
रागाच्या भरात हातून घडलेल्या काही चुकांमुळे बंदी कारागृहात आपली शिक्षा भोगत असतात. मात्र, हेच बंदीजन जेव्हा शिक्षा भोगून कारागृहाबाहेत पडतील तेव्हा त्यांच्या हाताला एखादे चांगले काम मिळावे आणि ते मुख्य प्रवाहात यावेत यासाठी कारागृहाकडून कैद्यांना विविध वस्तू बनविण्यासाठी मार्गदर्शन मिळते. यामध्ये बेकरी, शेती, फौंड्री, शिवणकाम, सुतारकाम, कापड, शोभेच्या वस्तू आदी विभाग असून त्याप्रमाणे कैद्यांना प्रशिक्षण दिले जाते. दीपावलीच्या पूर्वी त्यांच्याकडून आकर्षक पणत्या, आकाशकंदील बनवून घेतले जातात.
हेही वाचा - कोल्हापूर : दर्शनाच्या ई-पासविरोधात भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने