कोल्हापूर: उद्योगपती संतोष शिंदे यांनी अगदी लहान वयात मोठ्या कष्टाने अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत ते तेल उत्पादन, व्यायामशाळा, बेकरी उत्पादन यासह विविध उत्पादने करत होते. त्यांच्या या उत्पादनाला ग्राहकांची मोठी मागणी होती. त्यांचा हा व्यवसाय महाराष्ट्रासह मुंबई आणि कर्नाटकमध्ये देखील विस्तारला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाखाली ते महिनाभर जेलमध्ये देखील होते. यानंतर ते बाहेर आले. तुरुंगातून आल्यानंतर पुन्हा नव्याने उभे राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला; मात्र त्यांना यामध्ये अपयश आले यामुळे ते तणावाखाली होते.
उद्योगांमध्ये 500 हून अधिक कामगार: तणावातून संतोष शिंदे यांनी आधी पत्नी तेजस्वीनी आणि मुलगा अर्जुन (14 वर्षे) यांचा खून केला आणि त्यानंतर उद्योगपती संतोष शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. गडहिंग्लज पोलिसांनी या संदर्भात अद्याप कोणतेही माहिती दिली नसून पोलीस पोलीस अधिक तपास करत आहेत. संतोष शिंदे यांचे गडिंग्लज आणि त्याचबरोबर सकेश्वर परिसरात मोठा उद्योग व्यवसाय आहेत. या उद्योगांमध्ये जवळपास 500 हून अधिक कामगार कामावर आहेत. त्यामुळे गडहिंग्लज परिसरात खळबळ माजली आहे.
कोरोना काळात सामाजिक कार्य: आज सकाळी संतोष शिंदे बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या आईने शेजाऱ्यांना बोलवले आणि दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी बेडरूममध्ये तिघांचे मृतदेह आढळले. यावेळी पत्नी व मुलाचे जीवन संपवल्याचे दिसले. संतोष शिंदे यांनी कोरोना काळात बरेच सामाजिक काम केले होते आणि आता अशा परिस्थितीत ते जीवन संपवतील असे कोणालाही वाटले नव्हते. या घटनेमुळे गडिंग्लजमध्ये एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आत्महत्येच्या ठिकाणी सुसाईड नोट: संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. शहरातील ज्या महिलेने शिंदे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव या चिठ्ठीत लिहून त्यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह हलवू नये अशी भूमिका नागरिकांनी घेतली. शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी फेरी मारून बंदचे आवाहन करत त्या दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले होते.
हेही वाचा: