कोल्हापुर - जिल्ह्यात नुकतीच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. मात्र, अनेक गावांत गावकऱ्यांनी कौल एका पॅनेलला दिला मात्र खुर्चीसाठी अनेकांनी या पार्टीतून त्या पार्टीत उडी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. गावकऱ्यांनी ज्या पॅनेलला बहुमत दिले त्यांच्या विरोधात जाऊन सत्ता स्थापन केल्याची जिल्ह्यात अनेक उदाहरणे आहेत. शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड गावात सुद्धा हाच प्रकार घडल्याने चक्क 7 नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या अर्जुनवाड गावाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
नेमकं कोण फुटले अजूनही प्रश्न -
शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड गावात 13 सदस्य संख्येची ग्रामपंचायत आहे. नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये नंदकुमार पाटील यांच्या शाहू आघाडीला गावातील जनतेने कौल दिला आणि त्यांचे 7 सदस्य निवडणून आले. गावकऱ्यांनी स्पष्टपणे शाहू आघाडीला बहुमत दिले होते. मात्र, सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये शाहू आघाडीमधील एकजण फुटला आणि विरोधी गटाची अर्जुनवाड मध्ये सत्ता आली. विरोधी गटाच्या स्वाती प्रमोद कोळी सरपंच तर विश्वनाथ कदम हे उपसरपंच म्हणून निवडुन आले. सरपंच पदासाठी शाहू आघाडीमधील नंदाताई खोत आणि विरोधी गटातील स्वाती कोळी रिंगणात होत्या. त्यामध्ये स्वाती कोळी यांना 7 तर नंदाताई खोत यांना 6 मते मिळाली. उपसरपंच पदासाठी विश्वनाथ कदम यांना 7 तर संतोष पाटील यांना 6 मते मिळाली. सरपंच उपसरपंच निवडीवेळी गुप्त मतदान असल्याने शाहू आघाडीमधील नेमके कोण फुटले हाच प्रश्न निर्माण झाल्याने पॅनेल प्रमुखांसह सर्वच सदस्यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा द्यायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी आपले राजीनामे संबंधितांकडे सुपूर्द केले आहेत.
या सदस्यांनी दिला राजीनामा -
अर्जुनवाड गावातल्या शाहू आघाडीमधील 7 पैकी एक सदस्य फुटल्याने नेमका कोण फुटला हेच अद्याप समजले नाही. त्यामुळे पार्टीतल्या सर्वांनीच सातही जणांनी राजीनामे द्यायचा निर्णय घेतला. त्यानुसार 7 जणांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये नंदाताई खोत, संतोष पाटील, भारती परीट, शोभा डोंगरे, संगीता चौगुले, परसराम बागडी आणि संतोष दुधाळे यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातल्या अनेक गावांत असेच चित्र -
कोल्हापूर जिल्ह्यात 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. प्रत्यक्षात 386 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये अनेक ठिकाणी सरपंच पदाच्या आरक्षणाचा व्यक्ती बहुमत असलेल्या पार्टीकडे नसल्याने दुसऱ्या पार्टीचा सरपंच झाला आहे. तर अनेक गावांत ज्या पार्टीला गावकऱ्यांनी बहुमत दिले त्या पार्टीतले काहीजण केवळ खुर्चीसाठी या पार्टीतून त्या पार्टीमध्ये गेले असल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी खुर्चीसाठी फुटलेल्या सदस्यांचा गावकऱ्यांनीच निषेध केला आहे. शिवाय बहुमत नाकारून सत्ता स्थापन केलेली पार्टी गावात काय विकास करतात आणि किती दिवस सत्ता टिकवतात हेच पाहायचं आहे अशा प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त होत आहेत.
घोडेबाजार करून गावाच्या विरोधात जाणे कितपत योग्य ?
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावांत टोकाची ईर्ष्या पाहायला मिळते. त्यातून गावकरी एका योग्य पार्टीला बहुमत देऊन निवडून देतात. काही ठिकाणी कोणालाच बहुमत मिळत नाही अशीही उदाहरणे आहेत. मात्र, ज्या पार्टीला बहुमत आहे. त्यांचाच सरपंच व्हावा अशीच गावकऱ्यांची ईच्छा असते. मात्र, अनेक गावांत आर्थिक घोडेबाजार होऊन सदस्य फोडाफोडीच्या घटना घडतात. अनेकांनी असे आरोपही केले आहेत. हे गावाच्या विकासाला बाधक असून सर्वांनीच विचार करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.