कोल्हापूर- भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात सोमय्या यांच्या विरोधात प्रचंड संताप उसळला आहे. किरीट सोमैय्या यांनी मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुश्रीफ कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मुरगुड शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मुरगूड नगरपरिषदेने किरीट सोमैया यांना मुरगूड शहरात कायमची बंदी घालण्याचा ठराव पास केला आहे. मुरगूडचे नगराध्यक्ष राजू खान जमादार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
28 तारखेला सोमैयाचा दौरा-
भाजप नेते किरीट सोमैयांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी 19 सप्टेंबरला सोमैया महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमैयांना कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाबंदी केली. त्यानुसार पोलिसांनी सोमैयांना पहाटेच कराडमध्ये रेल्वेमधून उतरवले. त्यानंतर सोमैयांनी कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पुन्हा मी कोल्हापूरला दोन तीन दिवसात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी त्यांनी मी २८ सप्टेंबरला कोल्हापूरला जाणार असल्याचे ट्विट करत सांगितले. मात्र, यावर कोल्हापूर करांनी नवीच शक्कल लढवत सोमैयांना मुरगुड या शहरात कायमची प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
स्टंटबाजीसाठी शहरात येऊ नये-
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणाऱ्या सोमैयांचा निषेध करुन त्यांना कोल्हापुरातील मुरगूड शहरात कायमची प्रवेशबंदी करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. मुरगूड नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते.
मंत्री मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमैया यांचा या सभेत चांगलाच समाचार घेण्यात आला. मुरगूड शहर ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे स्टंटबाजी करण्यासाठी आणि सवंग लोकप्रियतेसाठी मुरगूड शहरात येणाचा प्रयत्न सोमैयांनी अजिबात करू नये, असा इशारा देत नगराध्यक्ष जमादार यांनी तीव्र शब्दात सोमैयांचा निषेध केला. तसेच सोमैयांना शहरात कायमचा प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
दरम्यान आज(गुरुवारी) सोमैया हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर कारखान्याची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. यावेळी ते येथील शेतकरी आणि कारखान्याच्या सभासदांच्या गाठीभेटीही घेणार आहेत.
हेही वाचा - ...तर किरीट सोमैया यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करू, कोल्हापूर नागरी कृती समितीचा इशारा
हेही वाचा - राज्यपाल निभावत आहेत मदमस्त हत्तीचा रोल, शिवसेनेची केंद्र आणि कोश्यारींवर कडाडून टीका