कोल्हापूर : सध्या एसटीच्या एका मालवाहतूक ट्रकमधून १० टनाच्या मालाची वाहतूक केली जाते. शिवाय व्यापाऱ्यांच्या इच्छेनुसार जिथे हवे असेल तिथे सेवा देण्याचे काम महामंडळाकडून केले जाते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी, शेतकरी, कारखानदार, दुकानदार, उद्योजक एकमेकांना जोडले गेले आहेत. यातून महामंडळाला चांगले उत्पन्न सुरू झाले आहे. त्यात आणखी एक प्रयोग एसटी महामंडळ राबवून जिल्ह्याअंतर्गत लहान, मोठ्या गल्ली बोळातील व्यापाऱ्यांना एकमेकांना जोडण्याचे ध्येय ठेवले आहे.
एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा अंतर्गत प्रवासी वाहतुकीसारख्या एसटी मालवाहतुकीच्या रूटनुसार दैनंदिन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे रोज उत्पादन-वस्तूची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सुरुवातीला सर्वाधिक मागणी असणाऱ्या मार्गावर दैनंदिन मालवाहतूक सेवा दिली जाणार आहे. गांधीनगर व गोकुळ शिरगाव याठिकाणी केंद्र उभारली जाणार असून राधानगरी, गारगोटी या मार्गावर सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर मागणीनुसार जिल्ह्याच्या विविध मार्गावर सेवा दिली जाणार आहे. याला महामंडळाची परवानगी मिळाली असून लवकरच राधानगरी, गारगोटी या मार्गावर एसटी मालवाहतुकीची सेवा मिळणार आहे.
एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने 1 जूनपासून एसटी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय कोरोना काळात एसटीची चाके थांबली असताना, एसटीची मालवाहतूक सेवा सध्या तरी महामंडळाची आधारकाठी बनली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून एसटीची मालवाहतूक सेवा सुरू असून, रोजच लाखो रुपयांचे उत्पन्न मालवाहतुकीतून मिळत आहे. त्यावर आता एसटी महामंडळाने जिल्हाअंतर्गत मालवाहतुकीच्या दैनंदिन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कशी असणार आहे मालवाहतुकीची 'ही' सेवा?
जिल्ह्यातील मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ग्रुप बनवायचा आहे. ज्यांचे रोजचे व्यवहार, वस्तूची आयात-निर्यात शहरांशी संबधित आहे. अशा व्यापाऱ्यांनी आपल्या मालाची ऑर्डर देऊन त्या व्यापाऱ्यांना आपला माल गांधीनगर, गोकुळ शिरगावाच्या केंद्रावर नोंद करायचा आहे. एसटीची मालवाहतूक प्रत्येक व्यापाऱ्याला एक टनांपर्यंत आपला माल इच्छित स्थळापर्यंत रोज ने-आण करण्याची सेवा दिली जाणार आहे. सुरुवातीला ही सेवा गारगोटी व राधानगरी शहरासाठी दिली जाणार आहे.
आतापर्यंत मालवाहतुकीचे मिळालेले उत्पन्न
जून २०२०
फेऱ्या- १३४
किलोमीटर- २१,५००.
मिळालेले उत्पन्न- ७ लाख,९४ हजार रुपये
जुलै २०२०
फेऱ्या-३३६
किलोमीटर-४७,५५७
मिळालेले उत्पन्न-१८ लाख ५६ हजार ६२१ रुपये
एसटीचे उत्पन्न वाढीसाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आणखीन कशी वाढ करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, हा नवीन प्रयोग राबवण्यात येणार आहे. याला मंजुरी मिळाली असून जिल्ह्यात राधानगरी, गारगोटी मार्गावर व्यापाऱ्यांना दररोज प्रवासी रूटप्रमाणे सेवा देण्याचे काम एसटीची मालवाहतुक करणार आहे. टप्प्याटप्प्याने ही सेवा सर्व शहरासाठी दिली जाणार आहे. व्यापाऱ्यांनी त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळ, कोल्हापूरचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी केले आहे.