कोल्हापूर : गणेश मूर्तींचे आज विसर्जन होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीचे सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला परवानगी नाही. त्यामुळे नागरिकांसह सर्वच गणेशभक्तांनी नियमांचे पालन करून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा, असे आवाहन सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले. शिवाय ज्यांचा कोरोनाचा दुसरा डोस घ्यायचे बाकी आहे, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर लस घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.
छोट्या मूर्तींचे पर्यावरणपूरक कुंडात विसर्जन करण्याचे आवाहन
मानाच्या तुकाराम माळी गणेशाच्या विसर्जनावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सुद्धा गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले. शिवाय प्रशासनाला सुद्धा नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. महानगरपालिकेकडून योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. इराणी खणीमध्ये सुद्धा विसर्जनासाठी जाताना मंडळातील केवळ मोजक्याच व्यक्तींनी विसर्जनासाठी जावे असेही त्यांनी म्हटले.
जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त
'या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच मिरवणुकीला परवानगी नाही. कोल्हापुरात ज्या मार्गावरून विसर्जन होते, त्या मार्गामध्ये यावर्षी बदल करण्यात आला आहे. येथील महाद्वार रोडवरून दरवर्षी विसर्जन मिरवणूक होत असते. मात्र या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गामध्ये बदल करून पर्यायी मार्गाने नागरिकांना सोय करून दिली आहे. त्या पद्धतीने विसर्जन पार पाडावे यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सर्वच भक्तांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. अनेक मंडळांनी आपल्या मंडळा नजीकच्या महानगरपालिकेकडून सोय करण्यात आलेल्या विसर्जन कुंडात विसर्जन करण्याची तयारी दर्शविली आहे. त्या पद्धतीनेच विसर्जन होणार आहे. तर गतवर्षीपेक्षा यावर्षी गणेश मूर्तींची संख्या अधिक असल्याने काही वेळ लागण्याची शक्यता आहे', असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले.
हेही वाचा - नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानशी संबंध; त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला विरोध- अमरिंदर सिंग