कोल्हापूर - जिल्ह्यातील पन्हाळा गडाशेजारीच असलेल्या पावनगडावर मोठा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. दिशादर्शकाचे फलक लावत असताना हा ऐतिहासिक ठेवा सापडला. यामध्ये 400 हुन अधिक तोफगोळे सापडले असून अजूनही तोफगोळे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तोफगोळे सापडल्याची ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र याची एकच चर्चा सुरू आहे. दरम्यान, पावनगड स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. त्यामुळे हे तोफगोळे शिवकालीनच असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिशादर्शक फलक लावत असताना -
वनविभाग आणि टीम पावनगड संस्थेच्या माध्यमातून पावनगड येथे दिशादर्शक फलक लावण्यात येत होते. यासाठी खड्डा काढत असताना त्यामध्ये तोफगोळे सापडले. एक दोन नव्हे तर तब्बल 400 हुन अधिक तोफगोळे सापडले असून अजूनही तोफगोळे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात तोफगोळे सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून शिवभक्तांसह इतिहासप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, याबाबत पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती दिली असून ते याबाबत पंचनामा करत आहेत.
पूर्वी पावनगडावर दारू गोळ्याचे कोठार?
पावनगड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. पन्हाळा गडाच्या बाजूलाच हा किल्ला आहे. याठिकाणी भक्कम तटबंदी आहे, शिवाय बुरुजही आहेत. जखमी सैनिकांच्या जखमा भरून येण्यासाठी त्या काळी गायीच्या जुन्या तुपाचा वापर केला जात असे. या तुपाच्या साठवणुकीची विहीर आजही पावनगडावर आहे. गड बांधताना बांधलेली दोन सुंदर दगडी मंदिरेही आज पाहायला मिळतात. त्याचबरोबर दारू गोळ्याचे कोठारसुद्धा याठिकाणी असावे, असा अंदाज इतिहास संशोधक व्यक्त करत आहेत.