कोल्हापूर - भारतात कोरोनो विषाणूबाबत भीती निर्माण झाल्यानंतर समाजमाध्यमांमधून अनेक अफवांना उधाण आले. यात 'चिकन खाल्ल्याने कोरोना होतो,' अशी 'अफवा' पसरली. याचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. अशातच कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाने जवळपास 3 लाख कोंबड्यांची पिल्ले आणि दोन लाख अंडी नष्ट केली आहेत.
चिकनला मागणीच नसल्याने अनेक पोल्ट्री व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आजरा तालुक्यातील एका पोल्ट्री व्यावसायिकाने 25 फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये कोंबड्यांची पिल्ली आणि अंडी पुरून नष्ट केली आहेत. चिकन आणि अंड्यांचे दर कोसळल्याने या व्यावसायिकाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यावरून पोल्ट्री व्यावसायिकांवर कोसळलेले हे संकट किती भयानक आहे, हेच दिसून येत आहे. त्यामुळे आता अडचणीत सापडलेल्या पोल्ट्री धारकांना शासनाने मदत करावी अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांमधून होऊ लागली आहे.