कोल्हापूर - वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा काल (रविवार) कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेकांच्या घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेले. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव या गावाला सुद्धा वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला. या गावातील जवळपास चाळीसहून अधिक घरावरचे पत्रे उडून गेले आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जमीनदोस्त झाला आहे.
हेही वाचा... अरबी समुद्रात चक्रीवादळ; महाराष्ट्र-गुजरात सीमेवर ३ जूनला धडकणार
एकीकडे सर्व नागरिक आणि प्रशासन कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. तर दुसरीकडे आता शेतकरी आणि कष्टकरी नागरिकांना नैसर्गिक संकटाविरोधातसुद्धा लढा द्यावा लागत आहे. रविवारी या प्रदेशात झालेल्या नुकसानीचे महसूल, कृषी विभागामार्फत पंचनामे करणे सध्या सुरू आहे. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून शक्य तितकी आणि लवकरात लवकर मदत केली जाईल, असे मंडल अधिकारी अजय लुगडे यांनी म्हटले आहे.
मागील दोन दिवसांपासून कोल्हापुरातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी शेकडो एकर ऊसाचे नुकसान झाले आहे. तसचे जिल्ह्यातील शेकडो नागरिकांच्या घरांसह जनावरांच्या निवाऱ्याच्या जागेचे, ग्रीन हाऊस, दुकाने यांची छते उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा... आईपासून दुरावलेले माकडाचे पिल्लू अन् हरणाच्या पाडसाची अनोखी मैत्री
पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव या छोट्याशा गावाला सुद्धा वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि गारपीट याचा मोठा फटका बसला आहे. गावातील तब्बल 45 घरांचे पत्रे उडून गेले आहेत, तर अनेकांच्या ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील अशोक पाटील या शेतकऱ्याच्या 3 एकर क्षेत्रातील ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील संपूर्ण ऊस वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला आहे. दरवर्षी 120 टन ऊस उत्पादन मिळणाऱ्या शेतातून आता 30 ते 40 टन तरी ऊस मिळेल की नाही, याची शंका आहे. अशोक पाटील यांच्याप्रमाणेच गावातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याची नुकसान भरपाई द्यावी, असे शेतकऱ्यांची मागणी आहे.