कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये काल (सोमवारी) सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट झाली. चिकोत्रा खोऱ्याला गारपीटीमुळे शिमला-मनालीचे रूप आले होते. पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, गारपीटीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रेसुद्धा उडून गेले आहेत.
शहरात रस्त्यावर पाणी -
कोल्हापूरसह गडहिंग्लज, वडगाव, शाहूवाडी, इचलकरंजी आदी परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला. जिल्ह्यात संचारबंदी असल्याने बहुतांश नागरिक घरीच होते. रस्त्यावरची वर्दळ कमी होती तर बाजारपेठाही बंद होत्या. पावसामुळे काही ठिकाणी गटारी तुंबून रस्त्यावर पाणी साचले होते. सुरक्षेच्या कारणास्तव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी पाऊस -
गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी या भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. चंदगड तालुक्यातील हिंडगाव, शिरगाव, नागवे येथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मोठा वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती.
वीज कोसळून लाखो रुपयांचे नुकसान -
शाहूवाडी तालुक्यात सलग दोन दिवस वादळी पाऊस झाला. उचत गावातील तीन कुटुंबांच्या घरावर वीज कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यात अवकाळीचे संकट
देशात सध्या अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतासह उत्तरेकडील काही राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि तमिळनाडूची दक्षिण किनारपट्टी दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. राज्यातील दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबईत इडली-वडा विकणाऱ्यांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ