कोल्हापूर - कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अजूनही मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. परिणामी जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे सुद्धा उघडले आहेत. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
दोन दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे येथील पंचगंगा नदीची पाणीपातळीसुद्धा 20 फुटांवर पोहोचली आहे. गेल्या 12 तासांत पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तब्बल 9 ते 10 फुटांनी वाढ झाली असून जिल्ह्यातील तब्बल 10 बंधारेसुद्धा पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भुईमूग, सोयाबीनचे पीक अक्षरशः डोळ्यासमोर कुजताना पाहावे लागत असून भात पिकाचीसुद्धा प्रचंड हानी झाली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे भाताची शेती भूईसपाट झाली आहे. तर भुईमूगाच्या शेंगांना कोंब आल्याची परिस्थिती आहे. अगदी काढणीला आलेल्या पिकावर परतीच्या पावसाने वरवंटा फिरवल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. एकीकडे आधीच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाच्या संकटामध्ये आता अधिकच वाढ झाली आहे.
'तत्काळ मदत जाहीर करा' - चंद्रकांत पाटील
सर्वच ठिकाणी परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील भात, भुईमूग, सोयाबीन, मका, ऊस पीक साचलेल्या पाण्यात कुजत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे, राज्य सरकारने कशाचीही वाट न पाहता तत्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा - हजारो हेक्टरवरील पीकं कुजली, शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत