कोल्हापूर : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाने कोल्हापूरची जीवनदायी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 33 फूट इतकी नोंदली गेली आहे. तर जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांचा येलो अलर्ट जारी केला आहे.
एकूण 56 बंधारे पाण्याखाली : कोल्हापूर शहरासह राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात आजही मुसळधार पाऊस कोसळला. राधानगरी काळम्मावाडीसह लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे, धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळीही वाढत आहे. काळम्मावाडी धरणामध्ये 29.47 टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्य मार्गांपैकी तीन जिल्हा आणि दोन राज्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने, वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 56 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धबधबे पर्यटनासाठी बंद : भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्याजवळ ओढ्याचे पाणी आल्याने, पुराच्या पाण्यात सापडलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. तर वर्षा पर्यटनासाठी राधानगरी भुदरगड, गगनबावडा, शाहुवाडी तालुक्यातील धबधब्यांवर पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी स्थानिक प्रशासनाने भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ला, शिवडाव येथील नाईकवाडी धबधबा, दोनवडे येथील सवतकडा धबधबा यासह तोरस्करवाडी धबधबा जुलै ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत बंद केला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अश्विनी वरुटे यांनी दिली. तसेच राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबाही बंद करण्यात आला असल्याचे, पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांनी कळवले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित : हवामान खात्याने सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिल्यानंतर, शिवाजी विद्यापीठाच्या संलग्नित असलेल्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या परीक्षा गुरुवारी 20 जुलै रोजी स्थगित करण्यात आल्या. 21 जुलैपासून नियमित वेळापत्रकानुसार परीक्षा होतील अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
हेही वाचा -
- Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर; रांगणा किल्ल्यावर पर्यटक अडकले तर राऊतवाडी धबधब्याने दाखवले रौद्ररूप
- Heavy Rainfall in Kolhapur: धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली
- Kolhapur Flood : संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज; एनडीआरएफची तुकडी दाखल