कोल्हापूर : जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील पूरबाधित 27 गावातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती, उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचे स्थलांतर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायमच असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणातून कोणात्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू होवू शकतो. त्यामुळे २०१९ व २०२१ साली ज्यांच्या घरात पुराचे पाणी आले होते, त्या नागरिकांनी तातडीने शासकीय निवारागृहात किंवा आपल्या सोयीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही मागील पुरावेळी पाणी आले होते. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजला तातडीने स्थलांतरीत करण्यात आला आहे.
पन्हाळा तालुक्यात अतिवृष्टीने डोंगर खचला : जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, नावलीपैकी धारवाडी येथे डोंगर खचला आहे. या डोंगराला सर्वत्र भेगा पडल्या आहेत. प्रशासनाने सर्व उपायोजना केल्या आहेत. येथील कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इर्शाळवाडी येथील डोंगर खचून गावच डोंगराखाली गेल्याची घटना ताजी असताना, आता पन्हाळा तालुक्यातही डोंगर खचू लागल्याने, नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गावातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी : करवीर तालुक्यातील आरे, चिखली, आंबेवाडी, कोल्हापूर शहर गांधीनगर वळीवडे, हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, शिरोली पुलाची, इंगळी, शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, राजापूर, खिद्रापूर, गणेशवाडी, मजरेवाडी, गौरवाड, बुगनाळ, आलास अब्दुललाट, शिरोळ, कुरुंदवाड, धरणगुत्ती, नांदणी, हेरवाड तेरवाड, शिरदवाड आणि टाकवडे या गावातील शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत.
हेही वाचा -
- Bullocks Died: उत्रे येथे गोठ्याला आग तर पुराच्या पाण्यात बुडून बैल जोडीचा दुर्दैवी मृत्यू
- Kolhapur Rain Update: पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; धोका पातळीकडे वाटचाल, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश
- Heavy Rainfall in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर