कोल्हापूर - येथील पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
मंदिर परिसरात असणाऱ्या राम मंदिराचा फक्त कळस दिसत आहे. देवस्थानच्या अन्न छत्राजवळ पुराचे पाणी आले आहे. मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायण स्वामी मठात ठेवण्यात आली आहे. सात ते आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शिवाय जिल्ह्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे सद्या जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कुरूंदवाड पुलाजवळ पाण्याची पातळी 53 फुटापर्यंत गेली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास नागरी वस्तीत पाणी शिरण्याची शक्यता आहे.