कोल्हापूर - जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल तीन फुटांनी वाढ झाली असून राजाराम बंधारा सुद्धा पाण्याखाली गेला आहे. यंदाच्या या पावसाळ्यात पहिल्यांदाच राजाराम बंधारा पाण्याखाली गेला असून बुधवारी रात्री दहा वाजता बंधाऱ्यातील पाणी पातळी १६.३ फुटांवर पोहोचली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
आपत्ती यंत्रणा सज्ज -
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. बुधवारी रात्री १० वाजता पाण्याची पातळी १६.३ फुटांवर गेली होती. दिवसभरात १२ तासांत तब्बल ३ फुटांनी पाणीपातळीत वाढ झाल्याने जिल्हा आपत्ती यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, गेल्या एक आठवड्यापासूनच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अनेक भागात पथके तैनात करण्याची तयारी केली आहे. शिवाय यंदा सुद्धा महापुराची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यामुळे सर्वच विभाग सज्ज झाले आहेत.
हेही वाचा - कोल्हापुरात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; तर दिवसभरात 29 जणांचा मृत्यू