कोल्हापूर - जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. २४ तासांत तब्बल १२ फुटांनी पाणी पातळी वाढली असून राजाराम बंधाऱ्यासह एकूण ४३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय जिल्ह्यातील काही मार्गावर पाणी आले असून काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.
बुधवारी पाणीपातळी १३ फुटांवर होती आता २४.६ फुटांवर -
बुधवारी पहाटेपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकसारखा पाऊस सुरू आहे. काल सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथील पाणी पातळी १३ फूट इतकी होती. त्यामध्ये जवळपास १२ फुटांनी वाढ झाली असून आज सकाळी ८ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २४.६ इतकी झाली आहे. तर जिल्ह्यातील तब्बल ४३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर काही मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद असून जिल्ह्यातील कोल्हापूर गारगोटी रोड वरील चंद्रे फाटा-शेळेवाडी मध्यभागी पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी पर्यायी केलेला रस्ता पाण्याने वाहुन गेला आहे. त्यामुळे त्यांनी पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी पातळीत झपाट्याने वाढ -
रात्रीत तब्बल ८ ते ९ फुटांनी पाणी पातळी वाढली आहे. बुधवारी रात्री १० पर्यंत पाणी पातळी १६ फूट इतकी होती. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
आपत्ती यंत्रणा सज्ज -
२०१९ च्या महापुराचा अनुभव पहाता आणि संभाव्य पुराचा धोका ओळखून यावर्षी सुद्धा जिल्ह्यातील आपत्ती यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पथके तैनात करण्यात आली आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापनकडे मोठ्या प्रमाणात बोट आणि इतर साहित्य सामाजिक संस्था आणि व्यक्तींकडून मिळाले आहे, तर काही गोष्टी स्वतः प्रशासनाने आणल्या आहेत.
हेही वाचा - MH Live Breaking: कोल्हापुरात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली