कोल्हापूर : कार्तिकी यात्रेसाठी पायी दिंडीतून निघालेल्या वारीत भरधाव गाडी घुसल्याने 7 वारकऱ्यांचा मृत्यू ( 7 died )झाला होता. त्यातील कोल्हापूरच्या सात जणांचा समावेश होता. त्यातील जठारवाडी मधील 5 जणांना आज एकाच चितेवर ठेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे महामार्गावर हा भीषण अपघात ( terrible accident ) झाला होता. एरव्ही भजनासाठी मंदिरात जमणारे सर्वजण याच वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी टाळ मृदुंग घेऊन अंत्यसंस्कार ठिकाणी जमा झाले होते. त्यामुळे आज अवघे जठारवाडी गाव सुन्न झालेले, यावेळी पाहायला मिळाले.
विठुरायाच्या दर्शनासाठी जाताना काळाचा घात - रविवार ( 31 ऑक्टोबर ) रोजी पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घात केला. कार्तिक यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातल्या जठारवाडी येथील वारकरी पायी पंढरपूर कडे निघाले होते. सायंकाळी सातच्या दरम्यान दिंडी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळ पोहोचली होती. त्याचवेळी मिरज पंढरपूर मार्गावर मिरजेकडून येणार एका भरधाव गाडी त्या दिंडीमध्ये मागून येऊन घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. विठुरायाचे भक्तीत तल्लीन असलेल्या भक्तांना काही कळायच्या आता घडलेल्या घटनेत सात जण हे जागीच ठार झाले. ज्यामध्ये ५ महिला, २ पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाला होता. मृतांंमधील ५ जण जठारवाडी गावातील होते तर दोन वळीवडे गावचे रहिवासी होते जे जठरवाडी गावातील पाहुणे म्हणून आले होते आणि दिंडीत सहभागी झाले होते. सुनीता पवार आणि गौरव पवार (वय 14) असे या दोघांची नावे आहेत. ज्यांच्यावर त्यांच्या वळीवडे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दिंडीमध्ये 35 जण विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघाले होते.
जठारवाडी व वळीवडे गाव शोकसागरात बुडाले - दरम्यान, या भीषण अपघातानंतर कोल्हापूरातील जठारवाडी आणि वळीवडे गाव शोकसागरात बुडाले आहे. रात्रभर गाव गदी सुन्न झाले होते. आज सकाळी यातील ५ जणांना एकत्र रचलेल्या चितेवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या पाच जणांमध्ये शारदा आनंदा घोडके (वय ६१), रंजना बळवंत जाधव (वय ५८), शांताबाई शिवाजी जाधव (वय ६०), सर्जेराव श्रीपती जाधव (वय ५४), सुनीता सुभाष काटे (वय ५०) या पाच जणांचा समावेश होता. यावेळी वारकरी आणि गावातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.