कोल्हापूर- शहरात जाती - धर्मा पलीकडे जाऊन माणुसकी जपल्याची प्रकार पाहायला मिळतोय. कोल्हापूरातल्या मणेर मस्जिद व्यवस्थापनाने सुरू केलेले काम त्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. मणेर मस्जिद व्यवस्थापणाने कोरोना रुग्णासाठी मोफत ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध केली आहे. ज्याचा लाभ आजपर्यंत २ हजार जणांनी घेतला आहे. अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मणेर मस्जिद व्यवस्थापनाने सुरू केलले हे काम कौतुकास्पद ठरत आहे.
मोफत ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा
महापूर असो, जातीय दंगल असो किंवा मग एखाद्या समाजाचा मोर्चा, अशा संकटकाळात कोल्हापूरकर जातीभेदाच्या भिंती बाजूला सारून एकमेकाेच्या मदतीला पुढे येतात. कोरोना सारख्या महामारीत देखील सामाजिक संस्था आणि व्यवस्थापनांनी ही परंपरा कायम राखली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या एका बाजूला कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. वेळेत ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागतेय. हातावरच पोट असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना तर ऑक्सिजनचा खर्च भागवायचा कसा? हा मोठा प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शनिवार पेठेत असलेल्या मणेर मस्जिद व्यवस्थापनने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ज्याद्वारे गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जातोय.
२ हजारहून अधिक रुग्णांना लाभ
जवळपास सात लिटरचा सिलेंडर फक्त कोरोना रिपोर्ट पाहून नातेवाईकांकडे दिला जातोय. गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या उपक्रमाला प्रतिसाद देखील मिळत असून आतापर्यंत २ हजारहून अधिक रुग्णांपर्यंत मोफत ऑक्सिजन पोहोचला आहे. दरम्यान या सेवेमुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंदिर, मस्जिद व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या माणुसकी धर्माच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.