कोल्हापूर - येथे आलेल्या भयंकर अशा महापुराच्या संकटामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अनेकांची घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोकांना स्थलांतरित करावे लागले आहे. आता स्थलांतरित सर्वच नागरिकांच्या आरोग्याची समस्या समोर आली आहे. आरोग्याची समस्या डोळ्यासमोर ठेऊन अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय नेते आता मदतीसाठी समोर आले आहेत. येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागातसुद्धा या आरोग्य शिबिराचे आयोजन करून पूरग्रस्तांना आरोग्याच्या सोयी पुरवण्याचे काम सुरू आहे. शहरातील राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड, बलराम कॉलनी(फुलवाडी), दुधाळी पॅव्हेलीयन, रायगड कॉलनीसह, उचगाव, वळीवडे, गांधीनगर, वसगडे, आदी ठिकाणी ही मोफत सेवा आता पूरग्रस्तांसाठी सुरू आहे.