कोल्हापूर - एकाच कुटुंबातील चार जण कृष्णा नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव मध्ये घडली आहे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातल्या अथणी तालुक्यात ही घटना घडली असून पाण्यात बुडालेल्या बांधवांचा अजूनही शोध सुरू आहे. अंथरून धुण्यासाठी गेल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली. एनडीआरएफ, कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून ही शोधमोहीम सुरू आहे. स्कुबा डायव्हिंगद्वारे पथकातील जवानांकडून सकाळपासून शोध मोहीम सुरू आहे.
नदीमध्ये बुडालेल्या बांधवांची नावं पुढीलप्रमाणे : परशुराम गोपाल बनसोडे (वय 36), सदाशिव गोपाल बनसोडे (वय 24), शंकरा गोपाल बनसोडे (वय 20), दर्याप्पा गोपाल बनसोडे (वय 22) अशी पाण्यात बुडालेल्या चार भावांची नावे आहेत. सोमवारी अंथरून धुण्यासाठी गेलेल्या चार भावांपैकी एकजण बुडत असताना बाकीचे त्याला वाचविण्यासाठी गेले. सर्वजण नदीमध्ये बुडाले असून मंगळवार सकाळपासून त्यांची शोधमोहीम सुरू आहे. कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान अद्ययावत साधन सामुग्रीसह शोध मोहीम करत आहे. यासाठी उपलब्ध स्क्युबा डायव्हिंग यंत्रणेचा वापर केला जात आहे.
हेही वाचा - उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणात बीड कनेक्शन; तीन जण युपी पोलिसांच्या ताब्यात