कोल्हापूर- जिल्ह्यातील गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी गावाजवळ पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि कारच्या भीषण अपघातात ३ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मागील दहा दिवसांमधील हा तिसरा अपघात आहे. यापूर्वी झालेल्या दोन अपघातामध्ये एकूण नऊ जणांना आपली जीव गमवावा लागला आहे.
सोमवारी मध्यरात्री १२ वाजता हरळी गावाजवळ रस्त्याकडेला थांबलेल्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने कारमधील तीन कॉलेज तरुण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सूरज तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता. कागल), विशाल पांडुरंग पाटील (गोकुळ शिरगाव), सूरज भरमा पाटील (बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर संदेश तिप्पे (रा. तमनाकवाडा) आणि अजिनाथ खुडे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेले तीनही तरुण महागाव येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत होते. ते नेसरी येथे एका मित्राला भेटायला गेले होते. त्याला भेटून रात्री गडहिंग्लज येथील वसतीगृहावर परत येत होते. यावेळी हरळी येथील इंचनाळ फाट्यावर रस्त्याच्या कडेला कार उभी करून ते लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी चंदगडहून गडहिंग्लजकडे मोलॅसिस घेऊन जाणार्या कंटेनरने कारला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला.