कोल्हापूर - पंधरा दिवस जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दुख:मय आणि खडतर गेले. प्रलयकारी महापुरात जनतेची आणि एकूणच जिल्ह्याची मोठी हानी झाली. यादरम्यान, हजारो कोल्हापूरकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले. कोल्हापूरकरांच्या या माणुसकीच्या आणि साहसी वृत्तीला माझा सलाम. असे गौरवोद्गार सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी काढले आहेत.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिना निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्यायमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महापुराच्या रुद्रावतारात आपत्ती नियंत्रण यंत्रणा, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दलाबरोबरच जिल्ह्यातील स्वयंसेवी सेवाभावी संस्था, संघटना यांच्यासोबत हजारो कोल्हापूरकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेत. कोल्हापूरकरांच्या या माणुसकीला आणि साहशी वृत्तीला माझा सलाम. शिवाय केंद्र आणि राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी आहे. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, दिवंगत अभिमन्यू अर्जुन कदम यांच्या पत्नी शांताबाई अभिमन्यू कदम, स्वातंत्र सैनिक दिवंगत रंगराव कृष्णाजी गुरव यांच्या पत्नी गिताबाई रंगराव गुरव आणि ज्येष्ठ नागरिक यांना डॉ. खाडे यांनी गुलाबपुष्प देवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कामाचे देखील त्यांनी कौतुक केले.