कोल्हापूर - बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करवीर तालुक्यातील परिते येथे एका खोलीत गर्भ लिंग तपासणी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर कथित महिला डॉक्टर पसार झाली आहे. या छाप्यात पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे. वरिष्ठ पोलिसांनी या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश कोल्हापूर पोलिसांना दिले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, करवीर तालुक्यातील परिते येथे एका खोलीमध्ये गर्भलिंग तपासणी केली जाते, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे करवीर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी सेंटरमधील खोलीतून गर्भलिंग तपासणी झालेल्या महिलांच्या नावांची नोंद असलेल्या दोन डायर्या, सोनोग्राफी मशीन, वैद्यकीय उपकरणे, औषध साठा जप्त केला आहे. तसेच चौकशीअंती पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. महेश पाटील, सचिन दत्तात्रय घाटगे, सातापा कृष्णा खाडे, अनिल भिमराव माळी, भारतकुमार सुकुमार जाधव, अशी अटक केलेल्या एजंटांची नावे आहेत. सखोल चौकशी केल्यास आणखी काही एजंट समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांचा छापा पडताच कथित डॉक्टर असलेल्या राणी कंबळे व राजमती माळी या मागील दारातून पसार झाल्या.
मुख्य आरोपी राणी कांबळेच्या तपासासाठी पथके रवाना
करवीर तालुक्यातील परिते येथील गर्भलिंग तपासणी प्रकरण गंभीर आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या विरोधात कठोर कारवाईसाठी तपास अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. मुख्य आरोपी राणी कांबळे यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वीही राणी कांबळे विरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणातील मुख्य आरोपी राणी कांबळे यांच्या विरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. गर्भलिंगनिदान प्रकरणी 2017 मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली. कांबळे यांच्या सहकारी असलेल्या राजमती माळी यांनाही नोटीस बजावली असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - 'तो' अॅलिगेटर मासा अज्ञातानेच सोडला पंचगंगेत? वाचा, किती धोकादायक ठरू शकतो