कोल्हापूर - मटण विक्रीचे निकष न पाळल्याने अन्न व औषध विभागाने मटण दुकानांवर कारवाई केली आहे. मटण दुकानावर छापा टाकून कारवाई करण्याची आजपर्यंतची ही पहिलीच घटना आहे. यावेळी प्रशासनाकडून शाहुपुरी परिसरात असलेल्या राजू मटण दुकानात विक्रीसाठी असलेले मटण जप्त करून त्याची विल्हेवाट लावली आहे. ग्राहकांना असुविधा आणि कायद्याचे निकष पाळले नसल्याने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - 'कोल्हापूरकरांनो, लक्षात ठेवा तुमचा फोन यमालाही लागू शकतो'
कोल्हापूरमध्ये सध्या मटण दर आणि मटणाचा दर्जा याबाबत जोरदार वाद सुरू आहेत. कोल्हापुरात जवळपास 580 ते 600 रुपयांपर्यंत मटणाचे दर पोहोचले होते. पण, कोल्हापुरातील अनेक संघटना आणि तालीम मंडळांनी याला विरोध करत मटणाचे दर कमी करावेत याबाबत आंदोलन उभे केले. त्यानंतर मटण विक्रेत्यांनी मटणाचे दर जवळपास सव्वाशे रुपयांनी कमी केले. पण, त्यातच आता निकष न पाळल्याने ही कारवाई करून दुकान बंद करण्याचे आदेश दिल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.