कोल्हापूर : जिल्ह्यात गतवर्षी ८ जून रोजी मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले होते. यंदा मात्र 16 जून उजाडला तरीही पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. जिल्ह्यामधील प्रमुख धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. परिणामी प्रशासनाने पिण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवला असल्याने शेतकऱ्यांची पिके करपत आहेत. कोल्हापुरातील इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आज पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्ह्यातील उपसा बंदी मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी यावेळी पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक अकार्यक्षमतेमुळे शेतकरी सध्या अडचणीत आला असून पाण्याविना शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
नियोजनाचा अभाव : जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या कळमवाडी दूधगंगा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी धरणातील साठ एमसी पाणी कमी करण्यात आले याचा परिणाम म्हणून गेल्यावर्षी याच तारखेला दूधगंगा धरणामध्ये 6.45 टीएमसी इतका असणारा पाणीसाठा आज रोजी अवघा 1.44 टीएमसी इतका उरला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेती पिकांना पाणीपुरवठा केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो यामुळे प्रशासनाने उपसाबंदी लागू केली आहे. मात्र या सर्व गोंधळात पाटबंधारे विभागाचा नियोजन शून्य कारभार पाहायला मिळतो.
एक दिवसाआड पाणीपुरवठा : कोल्हापुरातील पाटबंधारे कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी बोलताना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदवडेकर म्हणाले, जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा कमी झाला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सर्व नियोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती आणि शहरांना एक दिवस आड पाणीपुरवठा करून उरलेले पाणी शेतीसाठी देण्याचा प्रस्ताव बांधिवडे कर यांनी मांडला यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता बांदवडेकर यांनी दिले.
अन्यथा उग्र आंदोलन : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे प्रशासनाने उपसा बंदी लागू केली आहे तर दुसरीकडे वीज पंपांना लाईट नसल्यामुळे आणि अनेक ठिकाणी भारनियमन सुरू आहे. पाण्याविना हाता तोंडाला आलेली पिके करपून जात आहेत, जिल्ह्यातील उपसाबंदी तात्काळ उठवावी अन्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी इरिगेशन फेडरेशनचे विक्रम पाटील किणीकर यांनी दिला.